Saturday, February 6, 2016

बाजीराव ...... डॉं. अविनाश लांडगे (सांगाती)

बाजीराव ...... डॉं. अविनाश लांडगे (सांगाती)
मागील वर्षी दिवाळीच्या सुटीत गावी गेलो होतो.हीच एक वेळ असते जेव्हा आम्ही सर्व मित्र एकत्र येतो, भेटतो, आणि पुन्हा बालपणात भटकून येतो. माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्याबद्दल आपल्या मित्राला जोपर्यंत अभिमान वाटत नाही तोपर्यंत स्वतःला भरून पावल्यासारखे होत नाही हे खरय. म्हणजे आपल्या यशाबद्दलची मजा जोपर्यंत आपल्या मित्राच्या नजरेत झळकत नाही तोपर्यंत जगण्याची आणि जिंकण्याची नशा अधुरीच.
दिवाळीच्या सुटीत गावी गेल्यावर बालपणीच्या सर्व मित्रांनी एकत्र यायचं. दिवाळीच्या दुसर्या दिवशी गेट टूगेदर  करण्याची प्रथा आम्ही सर्वांनी पाडलीय. एकत्र भेटल्यावर वर्षभरातील सुख, दुःख मौज, मजा अचीवमेटस याबद्दल गप्पा होतात. येथे येताना आम्ही एक नियम कटाक्षाने पाळलाय...... आपली जे काही सध्य स्थितीतील लेबल्स आहेत ती सर्व घरी ठेऊन यायची. आपले ते जुनेच आन्या, धन्या, योग्या, आव्या याच ओळखीमध्ये भेटायचे आपण. आमच्यामध्ये बरेच जन आता डॉंक्टर, इंजिनिअर, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य, वकील, झालेत. तर काहींनी स्वतःहून शेती व्यवसाय पत्करलाय. प्रत्येक वेळी बोलण्याची सुरुवात तुझ बरंय बाबा..... काही टेंशन नाही, नाही तर आमचे आज पाणी आहे तर हवामान ठीक नाही, हवामान ठीक आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर मजूर मिळत नाही,.... अशा तक्रार वजा गोष्टींनी होते. आम्हाला सगळ्यांना हे आता अंगवळणी पडलय.
मग हळूच योग्या सुरुवात करतो.... काय रे धनु किती वेळ काम करतोस तू शेतात.... “काम असे एक काही नसते रे ... पडेल ते करायचे बाकी काय” इति धनु.
हो तरी पण साधारण किती तास काम करतोस दिवसातून तू? योगेश विचारतो.
“सगळे स्वनियंत्रित केलेय मी बटन दाबायचे कामे ठेवलीत.” धनु सांगू लागतो. “तरी पण सकाळ दोन तास संध्याकाळी दोन तास.... बस्स. आणि हो सीजन ला पळापळ होते ती वेगळी. वरतून लोड शेडींग मुळे रात्रीचे उठावे लागते.”
योगेश एव्हाना कोणत्या दिशेने निघालाय हे आमच्या घराबाहेर, गावाबाहेर, पडलेल्या  मित्रांच्या लक्षात आलेले असते. “किती उत्पन्न काढतोस रे वर्षभरात?” योगेश पुन्हा विचारतो.
“सीजन सापडला तर ७-८ लाख कुठेच नाही गेले.” धनु फुशारकीने सांगतो.
“अरे वा! मग मजा कोणाची ते सांग रे भाऊ” योग्या विचारतो पुन्हा.
बघ आता आमची कहाणी ऐक. वर्षभर काम काम आणि काम फक्त. वर्षातून फक्त ८ रजा. वरून टार्गेट दिलेले. नाही झाले तर पगार कट. मध्येच रात्रपाळी लावलेली. कधी फोन करून बोलावतील भरवसा नाही. आणि वर्षाचे उत्पन्न ५-६ लाखाच्या पुढे नाही.  
तूच सांग आता कोण सुखी. अरे नोकरी चा अर्थच असा होतो कि नोकर बनून राहणे, कुणाचीतरी चाकरी करणे. कधी कधी वाटते की नको हे सगळे. तुझी तीच आमची गोष्ट. ‘जगण्याची गोष्ट सगळ्यांची सारखीच.’
“अरे सगळ्यात दुःखी कोण ची काय स्पर्धा करताय? आपण सुखी कसे हे सांगा... सुख मानण्यात असते. सुख काही विकत घेण्याची गोष्ट नाही कि जास्त पैसा असला म्हणजे आपण सुखी असा त्याचा अर्थ होत नाही.” आन्या उवाच. 
असाच वाद-संवाद चालू होता मागील सुटीत. इतक्यात राम्या धावत आला आणि धापा टाकत सांगू लागला.
“अरे ऐकल का?” काहीतरी सिरिअस घडले असणार हे एव्हाना आमच्या लक्षात आले होते. सर्वजन राम्याकडे बघत होते.
राम्या सांगू लागला. “अरे, ‘बाजीराव’ने पोईजन घेतले. दवाखान्यात नेलंय त्याला...” सर्वजन हळळले.. ‘अरेरे काय करून बसला हा...’
सर्वजन त्याला बघण्यासाठी हॉंस्पिटलला जाऊयात म्हणून सगळे उठले. गाडीत बसल्या बसल्या माझ्या डोळ्यासमोर बाजीराव च्या आयुष्याचा कालपट सरकू लागला.... बाजीराव ला मी सगळ्यात जास्त ओळखत होतो. प्रत्येक सुटीत आमची भेट होत होती. बाजीराव सर्व इतिवृत्त मला सांगत असे.
बाजीरावला मी ओळखत होतो तो त्याच्या शांत स्वभावामुळे. कधी कोणाल उद्धटपणे न बोलणारा अतिशय नम्र असा हा बाजीराव.
सुरुवातीच्या काळात शेतीला पाणी नसल्यामुळे बाजीरावने दुसर्याच्या शेतावर रोजंदारीने जाऊन उदरनिर्वाह केला होता. या कामी आई वडिलांची चांगली साथ त्याला लाभली. लग्न जरा लवकरच झाले. त्यामुळे तो, बायको, आई आणि वडिल अशी चार माणसे कामावर जात असत. रोजंदारीतून मिळणारे उत्पन्न अधिक कोरडवाहू शेतीतून मिळणारे उत्पन्न यांच्या मदतीने त्याने स्वतःची विहीरे खोदण्याचे ठरवले. स्वतःचे पाणी असल्याशिवाय आपल्याला बागायती शेती करणे शक्य नाही याची कल्पना त्याला होती. म्हणून त्याने हा निर्णय घेतला. आधीच कोरडवाहू भाग, विहिरीला पाणी लागणे तसे देवदूर्लभच पण बघू काही चमत्कार होतो का? शिवाय जरी पाणी लागले तरी पावसाळा, हिवाळा ऋतूत जरी पाणी मिळेल तरी आहे ती शेती चांगली बहरेल. उन्हाळा हिवाळा कांदे जरी लावले तरी भरपूर झाले असा विचार करून कमाला सुरुवात केली. निरागस माणसाच्या मागे देव नेहमी उभा राहतो. प्रामाणिक कष्टांची किंमत मिळतेच मिळते होळीच्या दिवशी पाणी लागले विहिरीला. ‘काय आनंद झाला  होता बाजीरावला!’. पाण्याची पूजा करून संपूर्ण मळ्याला  जेवण दिले होते बाजीरावने. होळीच्या दरम्यान पाणी लागले याचा अर्थ असाही होता कि उन्हाळ्यात सुद्धा पिण्यापुरते पाणी मिळणार होते. नाहीतर बायकोला दोन कि. मी. वरून डोक्यावर पाणी आणावे लागे. आता आपले चांगले दिवस सुरु झाले. आपल्याला श्रीमंतीचे दिवस जिवंतपणी पाहायला मिळणार म्हणून आईवडिलांच्या आनंदाला  पारावार उरला नाही. संपूर्ण आयुष्य त्यांनी दारिद्र्यातच घालवले होते. ज्या शेतकर्यांकडे पाणी मुबलक आहे तो कधी अपयशी होत नाही हे त्यांनी उदाहरणाने पाहिले होते.
तुटपुंज्या उत्पन्नाचा भोपळा फुटण्यासाठी पहिल्याच वर्षी घेतलेल्या भोपळा पिकाने चांगली साथ दिली.
या वर्षी बाजीरावाने ८० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले होते. विहीर खोदण्यासाठी चा आलेला खर्च वसूल झाला होता. शेती करण्यासाठी स्वतःचे अवजारे असणे गरजेचे  म्हणून त्याने एक छोटासा ‌‌‌‍‍टँक्टर विकत घेतला. घरच्या शेतीची मशागत करून दुसरेही काम त्याला मिळू लागले आणि उत्पन्नात अजून भर पडली.
दोन तीन वर्षातच बाजीरावची आर्थिक परिस्थिती सुस्थितीत आली होती. निसर्गाची साथ आणि त्याची ढोर मेहनत यांचा परिपाक म्हणून गाडी रुळावर येण्यास अजिबात वेळ लागला नाही. जेव्हा कधी आम्ही गावाकडे जात असू तेव्हा बाजीराव आवर्जून घरी बोलावून चहा पाजत असे. थोड्या कालावधीत “केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी जगात एक तरी व्यक्ती पाहिजेच. हे केलेले कौतुक माणसाला अजून उर्जा देते, हुरूप देते”, असे माझे मत आहे. ‘हा हुरूप समोर असलेला कष्टाचा डोंगर चुटकी सरशी अर्धा करून टाकते.’
तीन वर्षापूर्वी जेव्हा बाजीराव भेटला तेव्हा बाजीरावाने बंगल्याचे काम सुरु करायचे  ठरवले होते. पण काही कारणांनी त्याने तो रद्द केला. या वर्षी शेतात बटाट्याचे लागवड करण्याचे बाजीरावाने ठरवले होते. अजूनही कांदा, बटाटा , लसून,आल यांच्याकडे नगदी पिके म्हणूनच पहिले जाते. ठरल्याप्रमाणे बाजीरावने बटाट्याचे बियाणे शोधून आणून गादीवाफ्यावर बटाट्याची लागवड करण्याचे ठरवले. गावातील हा पहिलाच प्रयोग होता.आई वडील बायकोची साथ हतीच रात्र दिवस कष्ट करून बटाट्याचे पिक जोमाने वाढू लागले. पाणी देणे आणि एखाद दुसरा फवारा देण्याशिवाय विशेष काही काम आता राहिले नव्हते. बटाट्यातून चांगले उत्पन्न मिळणार याची खात्री बाजीरावला होती. ह्या वेळेला  आईला आणि बायकोला एक एक दागिना बनवून देऊ असा मनोमन इरादा त्याने केला.
दुपारच्या वेळी विशेष काही काम नसल्याने गावातील पारावर जाऊन बसण्याचे सत्र बाजीरावने सुरु केले. तेथे गावातील काही मंडळी पत्ते खेळत बसत. १३ पानांची रमी हा त्यांचा आवडता खेळ ते खेळत असत. बाजीरावही काही काम नाही म्हणून कुतूहलाने त्या खेळन्याकडे बघत बसे. पत्ते खेळणार्यार्यांमध्ये नानू नावाचा बाजीरावच्या वयाचा पट्टीचा खेळाडू होता. शक्यतो तो कधी हरत नसे. फार काही कमी नसे पण गमवावे लागत नसे असे काही पाने फिरवायचा तो, कि हरलेली बाजी हातात चांगली पाने नसतानाही जिंकत असे. हे सर्व पाहून बाजीरावला मौज वाटे. म्हणून बाजीराव नानूच्या पत्त्यांकडे विशेष लक्ष देऊन बसत असे. बाजीराव नेहमी नानूच्या मागे बसून पत्त्यांकडे बघत असे. नानुही मधूनमधून येथे हे पान पाहिजे हे पान आले तर असे पत्ते फिरवल्यास डाव पूर्ण करता येईल अशी चर्चा बाजीरावाबरोबर करी यातून या दोघांची चांगली मैत्री झाली. पण बाजीराव कधीही पत्ते खेळला नाही.
संध्याकाळच्या वेळी कुठेतरी अंडाभूर्जीची गाडी बघून दोघे भुर्जी खात असत. नंतर नंतर नानूच्या आग्रहास्तव बाजीराव एक दोनदा दारूही प्यायला. दोन महिने वेगाने सरकले दरम्यान बाजीरावची नानूच्या मित्रांबरोबर गट्टी जमली होती. नानुचे मित्र बाजीरावच्या स्वभावाची खूप प्रशंसा करत असत. चार सहा वेळा त्यांनी बाजीरावला पार्टीही दिली होती. बटाट्याचे पिक काढणीला आले होते. गादीवाफे नांगराने फोडून बटाटे गोळा करण्याचे काम आई, वडील व बाजीरावच्या बायकोने उन्हातान्हात केले.
यंदा बटाटे पुण्याला विकू. पुण्याच्या मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो असे नानुने बाजीरावला सुचवले होते. मागचा पुढचा विचार न करता नानू काय आपल्याला खोटा थोडेच सांगणार म्हणून बाजीरावने पिकअप मध्ये सर्व बटाटे भरले. आतापर्यंत नानू आणि नानुचे दोन तीन मित्र यांनी बाजीरावचा चांगलाच विश्वास संपादन केला होता. बटाटे विकण्यासाठी निघाल्यावर बाजीरावने नानुला फोन करून येतोस का पुण्याला म्हणून विचारले. नानुने हि दोन मित्रांना फोन करून बोलावून घेतले आणि सर्व जण बाजीरावचे  बटाटे विकण्यासाठी पुण्याला गेले. सगळ्या मार्केटमध्ये बाजीरावचा बटाटा एक नंबर दराने विकला गेला. ७०-८० हजार रुपये बाजीराव ला मिळाले होते. चार सहा महिन्याच्या कष्टांचे चीज झाले असे बाजीराव ला वाटले. सर्व मित्रांनी बाजीराव चे अब्भिनंदन केले. “पार्टी तो बनती है......” असे म्हनून बाजीराव ला पार्टीसाठी गळ घातली. “अर्थातच आपल्या जिगरी दोस्तांसाठी नाही तर कोणासाठी...” असे म्हणून बाजीराव तयार झाला. साधारण चाकण  च्या पुढे निघाल्यावर, एका बियर बार जवळ गाड्या थांबल्या. ए आज जरा चांगला ब्रांड मागवू असे म्हणून बाजीराव ने ब्ल्याक डॉग व्हिस्की ची ओर्डर दिली. आणि हो येताना जरा चिकन चिल्ली, मटन मोगलाई वगैरे चकण्यासाठी घेऊन ये..... बाजीराव ने वेटर ला फर्मावले. सर्व मित्र आज बाजीरावाच्या कोद्कौतुकाचे गोडवे गाण्यात गुंग होते. बाजीरावलाही आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटत होते. दोन तीन पेग नंतर दारू ने मेंदूचा ताबा घेतला. प्रत्येकाला मी फार महत्वाचे बोलतोय आणि बाकीच्यांनी फक्त माझेच ऐकले पाहिजे असे वाटू लागले. तर मध्येच कोणी तरी  भाऊ....  तू एकदम बरोबर बोलतोय असे म्हणून त्याला प्रोत्साहन देत होता. विषय नक्की कोणता सुरु आहे हेच कोणाला कळत नव्हते आणि बोलत तर सर्वजन होते. तेही फार महत्वाच्या विषयावर..... थोड्या वेळाने फक्त फुशार्कीच्या गोष्टी सुरु झाल्या. प्रत्येक जन मी काय काय भीम पराक्रम केलेत यावर बोलू लागला आणि पेग वर पेग रीचवू लागला. आपण कशी शून्यातून सुरुवात केली.... आणि परिस्थिती बदलवली हाच केंद्रबिंदू प्रत्येकाच्या संभाषणाचा होता. यथेच्च पिऊन झाल्यावर जेवता जेवता नारायणगाव जवळ एक संगीतबारी आहे असे सुचवले. संगीतबारी हा विषय तसा बाजीराव साठी नवीन होता..... आता हे काय असतंय..... बाजीराव नशेत बरळला. बाकीच्यांनी संगीत बारी म्हणजे काय हे याला माहित नाही... हा अजून अंड्यातून बाहेर आला नाही... म्हणून हसून त्याची टर उडवली. बाजीराव पूर्णपणे नशेत होता. त्याला त्याच्यावर हसून केलेला त्याचा अपमान सहन झाला नाही..... ए नान्या.... कॅह्ल आज संगीतबारी पहायची, असे खडसावले. सगळे टुंग झालेले होते. कोणाला कशाची शुद्ध नाही.... मग काय ठरले बारीला जायचे!
बारीजवळ उतरल्यावर नान्या बाजीराव ला म्हणाला ए बाज्या डे दहा हजार रुपये चाल.... दहा हजार रुपये? कशाला दहा हजार रुपये? बाजीराव ने डुलत डुलत विचारले.
“अरे मग काय बारी फुकट असती काय? का तो सिनेमा आहे? दोनशे रुपयात तिकीट काढून बसायला. चल दे  पैसे नाही तर चल परत.” नान्या ने निर्वाणीचे सुनावले. “च्यायला खिशात नाही अना आणि मला बाजीराव म्हणा” नान्याने बाकीच्यांना गाडीत बसायला सांगितले.
आता मात्र हा प्रतीष्ठेचा प्रश्न होऊन बसला होता बाजीराव च्या दृष्टीने. खिशात पैसा डोक्यात नशा अजून काय होणे अपेक्षित होते. मग काय बाजीराव ने दहा हजार रुपये भिरकावले नाण्याच्या दिशेने. आणि “ए नान्या हे घे पैसे चल आपण तुझ्यासारखे भिकारचोट नाय” बाजीराव नशेत बरळत होता. सर्वजन आत घुसले. बाजीराव ने प्रथमच हि बरी बघितली होती, पाहत होता. मराठी सिनेमा मध्ये जसे निळू फुले तक्क्याला पाठ लावून बसत असे व समोर नाच गाण्याचा कार्यक्रम चालू असे, प्रचलित भाषेत त्याला मुजरा म्हणतात. काहीसा असाच प्रक्रार तेथे चालू होता. भिंतीच्या कडेला मांडलेल्या गुबगुबीत गादयांवर बाजीराव आणि बाकी मंडळी बसली. खोलीमध्ये उंची अत्तराचा वास दरवळत होता आणि डोक्यामध्ये भिनत होता. डोक्यावर दारूने कब्जा केलेला होताच, वरून समोर नाचगाणे सुरु झाल्यावर मंडळींना स्वतःवर ताबा राहिला नाही. विक्षिप्त चाळे करत सर्वजन बारीची मजा घेत होते. आजूबाजूला तीच परीस्थिती होती. बेधुंद करणार वातावरण. प्रत्येकाला नशेत असताना स्वर्गात आल्यासारखे वाटत होते. स्वर्गात अप्सरा नाचतात म्हणे तसाच काहीसा प्रकार येथे सुरु होता यालाच स्वर्गसुख म्हणतात का? असे प्रश्न पडावे असा तो धुंद करणारा प्रकार. कुणी कुणी १०० च्या नोटा उधळत होते, ती नर्तकी मग हवेतच चुंबन देत असे,  कुणी ओठावर ठेवून त्या नाचणाऱ्या बाईला उचलायला लावत होते. आणि तिने ती नोट उचलल्यावर खुनशी नजरेने बाकीच्यांकडे मिशीवर पिळ देत पाहत होते. मग कुणी शंभर च्या ५ नोटंचा पंखा बनवून नजरेने त्या बाईला मांडीवर बसायला सांगत होते. असा सर्व एकंदर प्रकार तिथे चालला होता. हळूहळू बाजीराव मधला बाजीराव जागा झाला आणि बाजीराव ने नोटा उधळण्यास सुरुवात केली. आतापर्यंत बाजीराव आणि नान्या सोडला तर सार्वजन पेंगू लागले होते. नान्याने बाजीराव ला “आता बस कर” म्हणून सांगितले. पण बाजीराव काही ऐकायला तयार नव्हते. अजून एक लावणी झालीच पाहिजे म्हणून बाजीराव ने नोटांची गद्दी त्या बाईकडे फेकली. असे करता करता पहाटेचे चार वाजले. नान्याने सर्व मित्रांना उचलून गाडीत बसवले बाजीराव ला फ्रंट सीटवर बसवून गाडी घेऊन घरी घेऊन आला. सकाळी जेव्हा नाश उतरली तेव्हा सगळ्यांचे डोके दुखत होते. रात्री आपण काय केले याचा थोडासा अंदाज बाजीराव ला आला . बाजीराव ने खिसे चाचपले. सर्वच्या सर्व पैसे बाजीराव ने रात्री पार्टीत आणि बारीमध्ये उधळले होते. बाजीरावच्या डोक्यामध्ये मुंग्या आल्या. काय केले आपण?  बटाट्यासाठी अनालेलेल खते बी बियानेचे पैसे सुद्धा आपण  देणे बाकी आहेत. आईवडिलांच्या बाय्कोपोरांच्या सहा महिन्याच्या कष्टाच्या बदल्यात साधा खाऊ आपण त्यांना आणू शकलो नाही. आता आईबाबांना कोणत्या तोंडाने सांगायचे आपला बटाटा, तुम्ही व बायकोने कष्टाने पिकवलेला बटाटा पुण्याच्या मार्केट मध्ये एक नंबर दराने विकला गेला. आपण पिकवलेला बटाटा सर्वोत्कुष्ट होता. उन्हातान्हात राबणाऱ्या आपल्या मुलांसाठी एक बिस्किटचा पुडा आणताना दहंदा विचार करणारे आपण ८० हजार रुपये अशा प्रकारे उधळले. या वर्षी तूला चांगली साडी घेईल असे त्याने बायकोला वचन दिले होते. आणि बायकोने हि तुम्हाला एक लिनेन चा शर्ट घेऊ असे सांगितले होते. आई आणि बायकोला एक एक दागिना करून द्यायचे असेही त्याने मनोमन ठरवले होते. किती कष्ट उपसतात बिचार्या पण त्याची दखल कोणालाच नसते. बाजीराव पूर्णपणे निराश झाला. घरात चिडचिड करू लागला.
एकदा झालेली चूक सुधारण्यासाठी सुद्धा नियतीने बाजीरावला संधी दिली नाही. त्या वर्षी असलेले कर्ज जसेच्या तसे राहिले. पुढील वर्षासाठीच्या पिक उभारण्यासाठी बाजीराव ने  पुन्हा कर्ज घेतले. आणि यावेळी मात्र त्याच्या मागे साडेसातीचा फेरा लागला. नापिकी, दुष्काळ, निसर्गाचे सम विषम चक्र यामध्ये बाजीराव असा काही गुरफटला कि पूर्ण अर्थचक्र कोलमडून पडल.
‘व्याजाला झोप नसते’ असे म्हणतात, घेतलेल्या कर्जाचे व्याज फुगत गेले. कर्ज फेडण्यासाठी मोठ्या हौसेने घेतलेले टँक्टर विकावे लागले. यातून अधिकच निराशा पदरी पडली.
चाकणच्या पार्टीमध्ये मौजमजा करू लागलेले मित्र त्याला बघून रस्ता बदलू लागली. त्याच्याशी बोलणे टाळू लागली. खरा तर अशा वेळी मित्राच्या सहानुभूतीपूर्वक शब्दांची खूप गरज असते माणसाला. यातून नवीन उभारी घेता येऊ शकते. पण त्याचीच सगळीकडे वानवा होती. पार्टीत / बारीत मजा करणाऱ्या मित्रांनीच नंतर बाजीरावाने पार्टीत कसा ‘माज’ केला याबद्दल गावभर बोलू लागले. इकडून तिकडून बाजीरावाच्या कानावर या चर्चा येत मग मात्र बाजीरावला अश्रू अनावर होत. फार मोठी चूक झाली आपल्या हातून, फार मोठे पाप घडले अशा विवंचनेत बाजीराव स्वतःला कोसत राहिला, दोष देत राहिला. आधीच शांत असलेला बाजीराव फारसा कुणाशीच बोलत नसे मात्र आतल्या आत धुमसत राहिला. त्याला काहीच मार्ग दिसत नव्हता.
वर्षभर उन्हातान्हात काम करणाऱ्या आईवडिलांना बायकोला साधे अंगभर कपडे घेऊ शकत नाही आपण. पोरांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकायचे आपले स्वप्न अधुरेच राहणार का? खरे तर तो पैसा त्यांच्या कष्टाचा होता. आपण फार चुकीचे वागलो अशा विचारांनी बाजीराव आणखीच खंगत गेला.
दोन चार वर्षापासून पाणी पाउस नसल्याने विहीरही आटली होती. गावात कुणालाच पाणी नसल्याने मजुरीची कामे मिळणेही दुरापस्त झाले होते. अशात राहिलेले कर्ज फेडण्यासाठी बाजीराव मागे तगादा सुरु झाला. आता मात्र बाजीरावाच्या पायाखालची जमीन सरकली  होती. आणि या सर्व नैराश्यामध्ये बाजीरावाने घरात शिल्लक असलेले कीटकनाषक प्राशन  केले. आणि शेतात जाऊन झोपून राहिला. पण जसजसे किटकानाषक अंगात भिनू लागले तसतसा त्रास व मरणयातना बाजीरावाला होऊ लागल्या आणि तो तडफडू लागला. आणि घराकडे पळत सुटला शेजारपाजार्यानी त्याला उचलले व हॉस्पिटलला घेऊन गेले. बातमी कळल्यावर आम्हीही हॉस्पिटलला निघालो होतो. गाडी हॉस्पिटलजवळ येऊन थांबली विजू म्हणाला अवि उतर हॉस्पिटल आले. तेव्हा कुठे मी भानावर आलो आणि गाडीतून उतरून होस्पिटलच्या पायर्या चढू लागलो. होस्पितालच्या पायर्यांवर बाजीरावच्या वडिलांना डोक्याला हात लावून बसलेले पहिले आणि काळीज कळवले. बाजीरावच्या आईने मला पाहून मोठ्याने हंबरडा फोडला. डोळ्यात तरळणारे अश्रू रुमालाने टिपले आणि एका शेतकर्याचीच आत्महत्या का? हा विषय डोक्यात गर्दी करू लागला.

(५-२-२०१६) 

Wednesday, January 27, 2016

जागल्या....... डॉं. अविनाश लांडगे (सांगती)

जागल्या
.... डॉं. अविनाश लांडगे (सांगाती)
काळ परवा सहज न्यूज च्यानल सर्फिंग करत असताना एक आशावादी बातमी झळकली. जळगाव जिल्ह्यातील पारोळा गावातील काही विद्यार्थी (ज्यांच्या वडिलांनी आत्महत्या केल्या होत्या) गावागावात जाऊन दिंडी रूपाने प्रबोधन करत आहेत. माझ्या मनाला हि गोष्ट चटकन भावली. अर्थातच मीही शेतकऱ्याच पोर आहे. नेहमीच्या सवयीने त्या गोष्टीवर मनात मंथन सुरु झाले. आत्महत्या करणे वाईटच...... त्याबद्दल मतभेद असण्याचे कारण नाही. पण का होत असतील आत्महत्या !... आत्महत्या रोखण्यासाठी असा उपक्रम वारकरी संप्रदायाने हाती घेणे नक्कीच अशादायी आहे. नव्हे, भूतकाळात हे काम याच संप्रदायाने नेटाने लावून धरलेले दिसून येते. आपले भविष्य नेहमीच आशावादी, ध्येयवादी ठेवावे, त्यामुळे जगण्यासाठी उर्जा मिळते. हा आशावाद संत साहित्याने व वारकरी संप्रदायाने नेहमीच प्रफुल्लीत ठेवण्याचे काम केले आहे.
माझ्या लहानपणी आमच्या गावात भराडी म्हणून एका जमातीचे लोक येत असत. तसे हे लोक वर्षातून फक्त एकदाच येत. त्यात भराडी, नंदीवाले, वासुदेव अशी मंडळी असत. या सर्वांबद्दल गावकर्यांमध्ये कमालीची आपुलकी दिसून येत असे. एक चम्पाभर (आठवाभर) धान्य मग ते कोणते का असेना हे लोक प्रत्येक घरातून गोळा करत असत आणि बदल्यात वर्षभरासाठीच आशावाद प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात जागवून जात (सर्वांचे भविष्य सांगण्याचे काम करत). म्हणून त्यांना दिलेले ‘जागल्या’ हे नाव यथायोग्य आहे असे मला वाटते. त्यातल्या भराडी मंडळीवर माझे विशेष लक्ष असे.
अंगाने उंचापुरा, रुंद छाती, खांदे मजबूत, मिशांना सतत ताव मारण्याची सवय, जड भुवया, डोक्यावर फेटा पायात मेंधापालांकडे असतात तशा जड जड चपला, असा नजरेत भरणारा पेहराव या भराडी बुवांचा असे. डोळ्यात डोळे घालून बोलण्याची सवय त्यामुळे तो खोट बोलतच नाही मुली असा प्रत्येकाचा विश्वास. डोळ्याला डोळे भिडवून बोलण्याच्या व आवाजातील करडेपणा मुळे समोरचा लगेच संमोहित होई. मध्येमध्ये तुळजाभवानी व अंबाबाई च्या नावाचा जयघोष चालू असे. ५०-६० किलो धन्य तो दिवसाकाठी जमवत असे आणि ते त्याचे भक्कम खांदे हे सर्व उचलण्यास अर्थातच समर्थ होते.हा नेहमी पायी फिरे. त्यामुळे त्याच्या जाड जाड वाहणा त्याला नेहमी साथ देत असत. काळानुरूप तो नंतर सायकलवर येऊ लागला होता.
माझ्या घरी अठरा विश्वे दारिद्र्य होतेच. मजुरी शिवाय पर्याय नव्हता. वडील नेहमी मजुरीसाठी दुसर्याच्या बांदावर उभे. अर्थातच त्यामुळे आलेले नैराश्य कधीकधी मुलाबाळांवर निघे. ....... आणि मग आईलाही या गोष्टी नकोशा होत. काय आहे जगण्यामध्ये. असच’ मरणार का आपण. आणि नेमका अशाच वेळी वरील पैकी एखादा जागल्या येऊन हि आशावादाची ज्योत पेटवत असे.
नेमके नाव आठवत नाही पण शांताराम किंवा सखाराम तत्सम काहीतरी नावाचा हा भराडी आमच्याकडे उन्हाळ्याच्या सुटीत येत असे. मग घराच्या ओट्यावर बसून “आहे का कुणी घरात, माझा वाट घ्यायला आलोय” अशी हाक तो मारत असे. नेहमीप्रमाणे चम्पाभर (आठवाभर) धान्य घेवून आई बाहेर येई आणि त्याच्या झोळीत ओतत असे आणि आम्हा मुलाना घेऊन अंगणात बसत असे. हा भराडी मग वर्षभराचे भविष्य सांगण्यास सुरुवात करत असे. त्यात वडिलांबद्दल कोद्कौतुकाचे काही वाक्य असत.
     मालक तुमचे खूप तापत माई
     राग आल्यावर सहन होत नाही
     कष्ट करायला रावण हाय
पण खोट कधी सहन होत नाय
वडील कधीतरी शेजारी बसलेले असत मग तो म्हणे
     लई मोठ मन हाय तुमच भाऊ
लोक फायदा घेतात तुमचा भाऊ
आयुष्यात लई कष्ट केले तुम्ही भाऊ
कुणाबद्दल वाईट चिंतीत नाय तुम्ही भाऊ
पण तुमच्याविषयी वाईट करत्यात लोक भाऊ
पैसा लई कामावतेत तुम्ही भाऊ पण पैसा टिकत नाय
लई मेहनत करून काम होत नाय भाऊ
तोंडापाशी आलेला घास निघून जातोना भाऊ
देवावर लई श्रद्धा आहे तुमची भाऊ
पण देवाबद्दल तक्रार बी हाय तुमची भाऊ
पण येच्यात देवाचा देवाचा दोष नसतंय भाऊ
नशीब लई जोरात हाय तुमच भाऊ
सुख समाधान अन बक्कळ पैसा
लिहून ठेवलाय देवान भाऊ
लाथ मारणार तिथ पाणी काढणार तुम्ही भाऊ.......
मग आईकडे वळून “यंदा पाउस पाणी चांगला हाय माई. पुढच्या वर्षी अंगणात फटफटी (मोटारसायकल) दिसणार मला. आणि हे जर का खोट झाल तर हा सखाराम मिशीवर पिळ मारायचा बंद करेल माई”......
शेवटची फटफटी ची आशा लाऊन सखाराम उठत असे आणि भेटू परत पुढील वर्षी असे म्हणे. जाता जाता आई उगाचच हा माझा मोठा मुलगा म्हणून माझा हात त्याला दाखवी. “मुलाच्या हातातील धनरेषा गुप्त आहे (धनरेषा नाहीच माझ्या हातात) ती दिसत नाही. धनरेषा गुप्त आहे माई, गंगेच पाणी आटलं पण या पोराच्या हातातील पैसा कधी आटणार नाही. याच भविष्य फार उज्ज्वल आहे असे म्हणून सखाराम निघून जाई.
असा काही उत्साह संचारे सर्व घरात, घरातील सर्व नैराश्य त्या सखारामच्या येण्याने झात्खून जाई. पुढील वर्षी फटफटी येणार या कल्पनेने सर्व घर दुप्पट उर्जेने कामाला लागे. अशी महिने दोन महिने जात नाही कि पुन्हा कुणीतरी असाच जागल्या पुन्हा एकदा संपूर्ण घराला जागे करण्यासाठी येई. यावेळी मात्र गोष्ट वेगळी असे. ‘सध्या साडेसाती चालू आहे, कोणत्यातरी ग्रहाणे कोणत्यातरी ग्रहावर आक्रमण केले आहे. थोडे सबुरीने घ्यावे लागेल असा उपदेश करून हा निघून जाई.
माझ्या आठवणी नुसार साधारण नारा वर्षे अशीच पुढच्या वर्षी फटफटी नक्की. या आशेवर आईने कष्ट सोसले. बाराव्या वर्षी मात्र आईचा बांध फुटला. आणि ती त्या जगल्यावर ओरडली. “काय खोट बोलतोस, दरवर्षी सांगतोस पुढच्या वर्षी फटफटी नक्की फासिवातोस व्हाय रे मला भाबडीला. जा तू बोलू नकोस माझ्याशी”. आतापावेतो एवढ्या वर्षाचा ऋणानुबंधाने जागल्या देखील घराशी जोडला गेलेला असतो. घरातील सर्व सुख दुःख त्याला माहित झालेली असतात. गावातील भावकी सह सर्व इत्यंभूत माहिती त्याला या न त्या मार्गाने मिळालेली असते. कोणी कोणाल कसा त्रास दिला वगैरे त्याला माहित असते. आईच्या या बोलण्याने त्याच्याही डोळ्यात पाणी आले. पण हा भराडी मला  भावला तो एका गोष्टीमुळे, त्याने हर मानली नाही. तो पुढे म्हणाला, “माई, तू माझ्या बहिणीसारखी, बारा वर्षापूर्वी तुझा हात जेव्हा मी पहिला तेव्हाच जीभ चाच्रली माझी. बारा वर्षाची कमी अधिक साडेसाती होती तुम्हाला, याच वर्षी टी संपली. मुलाचे शिक्षण संपले आहे आता सुगीचे दिवस सुरु झालेत. निराश होऊ नकोस, तुझ्या सोन्यासारख्या दिवसांच्या जवळ तू पोहोचली आहेस. थोडी कळ सोस.यंदा धान्याच्या राशीनी खळ भरून जाईल. तुझी कोणती म्हणून कोणती तक्रार राहणार नाही.” पुन्हा एकदा दुर्दम्य आशावाद आईच्या मनात जागवण्यामध्ये हा यशस्वी झालेला असे. जाताना मात्र या वेळी या वर्षीचे धान्यही पुढील वर्षीच घेऊन जाईल असे म्हणून तो दिसेनासा झाला. पुढील वर्षी वडिलांनी जुनी का होईना एक राजदूत मोटारसायकल विकत घेतली. आईच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. आयुष्याचे चीज झाल्यासारखे वाटले तिला.   
अगदी हेच काम वारकरी संप्रदायानेही केले. दरवर्षी गावात असणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताहात कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारांनी शेतकरी जनतेमध्ये सचोटीची, चिकाटीचे व सबुरीचे बीज रोपण केले, याच आशावादावर शेतकरी तरला, जगला. दुःखाचे दिवस जातील, सुखाचे दिवस नक्की येतील पुढील वर्षी हरीनाम सप्ताहात यावर्शिपेक्षा दुप्पट देणगी या कार्यक्रमासाठी जमा होणार आहे. कारण हे क्षेत्र एक पुण्यक्षेत्र म्हणून उदयाला येणार आहे धनधान्य कधीच कमी पडणार नाही याची मला खात्री आहे असा आशावाद जागवून काल्याचे कीर्तन संपत असे आणि संपूर्ण गाव चैतन्यमय होऊन जाई. नव्या जोमाने कामाला लागे. गावातील एकीचे दर्शन त्यावेळी होई. गावात आडल्या नाडल्या साठी संपूर्ण गाव धावून जात असे. ‘संपूर्ण गाव एखाद्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे म्हटल्यावर काय हिम्मत आहे कोणाची आत्महत्त्या करण्याची. नव्हे तसा विचार सुद्धा कोणाच्या मनाला शिवणार नाही’.
कीर्तनकाराचा एक विश्वासाचा शब्द व आशावाद सर्वांना एकत्र बांधून ठेवायचा आणि म्हणून ‘मी वेगळा माझ दुःख वेगळ’ असा विचार सुद्धा कोणाच्या मनाला शिवत नसे. त्या साठी आत्महत्या हि तर फार दूरची गोष्ट.
मग आता काय बिघडलय! का करतात लोक आत्महत्या. काळानुरूप चित्र बदलले, काहीतरी घोळ केला या नवीन पिढीने..... सगळाच घोटाळा होऊन बसलाय .....

(२६ जाने.२०१६) 

Tuesday, January 19, 2016

पिंपळाच झाड ....... सांगाती


पिंपळाचे झाड....... डॉं. आविनाश लांडगे (सांगाती)
भटकती हा माझा आवडता छंद. लहानपणी वडिलांच्या धाकामुळे मी कधीच बाहेर पडत नसे. एक दोनदा प्रयत्न केला होता, पण नंतर खूप मरे खावा लागला होता. वडील खूप तापट स्वभावाचे असल्याने, त्यांना राग आल्यावर स्वतावरचा ताबा सुटत असे. मग मात्र काय होईल याची कोणालाच शाश्वती नसे. मी असा मार अनेक वेळा खाल्ला आहे. त्यांचा राग शांत झाल्यावर त्यांना त्याचा पश्चाताप होई आणि मग वडिलांना रडू अनावर होई व ते दूर शेतात जाऊन एकटेच रडत बसत.कित्येकदा मी त्यांचे अश्रू पुसून त्यांना घरी घेऊन आलो आहे. मोठा झाल्यावर मात्र फोटोग्राफीच्या निमित्ताने माझी भटकंतीची पुरेपूर हौस झाली. एकतर फिरायला मोटारसायकल मिळत असे. जेवणासाठी पैसे आणि पगार वेगळा. शिवाय लग्नसराई नेहमी उन्हाळ्याची सुटी किंवा दिवाळीची सुट्टीत असल्याने कॉलेज ला दांडी मारण्याचा प्रश्न येत नसे. मी खूप भटकलो, निरनिराळे प्रदेश पाहिले. तेथील लोक पाहिले. चालीरीती बघितल्या, लोकालोकांमधील द्वेष, मत्सर अनुभवले.
     कथाकथनाच्या निमित्ताने पिंपळाच्या झाडाची कथा सुचली. सुचली म्हणण्यापेक्षा मी ती कुठेतरी वाचली किंवा पहिली असण्याची शक्यता जास्त आहे. पण ती कथा मात्र मी गुंफली. कॉलेज जीवनात चंद्रशेखर गोखलेंच्या चारोळ्या आम्हाला खूप आवडायच्या.बर्याचशा तर माझ्या तोंडपाठ झाल्या होत्या.त्या चारोळ्यांची मदत मी कथाकथनात घ्यायचे ठरवले आणि मनाशी एक कथा गुंफली. मी आजपर्यंत कोणतेच भाषण कधीच लोहून काढले नाही.जसे असेल तसे समोरच्या लोकांबरोबर संवाद साधायचा हे आधीपासूनच ठरलेले.
कथाकथनाच्या दिवशी वैजापूर येथे लग्नात भेटलेल्या त्या लहान बाळाचे दादा-दादा, दादा-दादाचे स्वर माझ्या कानात गुंजत होते आणि त्या निरागस बलाचा चेहरा सारखा नजरेसमोर फिरत होता.बिडीच्या वेळी अश्रूंनी डबडबलेला चेहरा विसरणे शक्यच नव्हते.
कथाकथनासाठी  उभा राहिलो, आणि मी कथेला प्रारंभ केला........ स्वातंत्र्यापूर्वीचे गाव, ज्या गावात अस्पृश्यता अगदी टोकाची पाळली जात होती. अगदी अस्पृश्यांची सावलीसुद्धा अंगावर पडू द्यायची नाही इतकी ती पाळली जात असे. तेव्हा गावात एकत्र बसने, एकत्र जेवणे या गोष्टी फारच दूर राहिल्या. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत या अस्पृश्यांचा सहभाग नसे. असह प्रकारचे दुर्लक्षित जगणे काय कामाचे असा विचार कित्येकांच्या मनात येई. पण कधीतरी हि परिस्थिती बदलेल या आशेवर दिवस ढकलणे चालू होते. जगण्यासाठी माणूस किती टोकाला जाऊ शकतो याची अनेक उदाहरणे त्या गावात बघायला मिळत होती. चोर्या करणे हा किरकोळ विषय होता. पण एखादे जनावर मेल्यावर या क्षुद्र लोकांना बोलावले जात असे. त्या जनावराची कातडी काढण्यापासून तर मेलेल्या जनावराचे मांस खारवून (मीठ लावून ठेवणे) पर्यंत सर्व कामे हि मंडळी गरजेपोटी करत असत. जेव्हा केव्हा अन्न उपलब्ध नसेल, तेव्हा तेव्हा हे खारवलेले मांस पोटाची, मुलाबाळांची पोटाची खळगी भरण्यासाठी उपयोगात आणले जात असे कारण त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्यासमोर नसे.
आपल्या कहाणीचा नायक म्हादू. हासुद्धा या सर्वांपैकीच एक. चार वर्षांपूर्वी म्हादुच लग्न झाले. दुर्दैवाने त्याची बायको दोन वर्षातच एक तांह बाळ म्हादुच्या पदरात टाकून मरण पावली. खूप रडला म्हादू त्यावेळी. जीवापाड जपायचा तो आपल्या बायकोला.कारण लहानपणापासूनच अनाथ असल्याचे दुःख त्याने भोगले होते. प्रमानिक्पानाच्या जोरावर गावातील लोकांची मर्जी सांभाळत त्याने गावात स्वताची किंमत तयार केली होती. किंमत ती काय म्हणा, म्हादू सांगितलेल्या कामाला कधीच नाही म्हणत नाही, त्याच्या अंगी प्रामाणिकपणा आहे, बिचारा कधी चोर्या चकार्या करत नाही. हेच ते काय त्याच्या किमतीचे लेबल. अर्थात याच एका किमतीच्या लेबल्साठी गरीब माणूस आयुष्यभर झटत असतो......... बायको गेल्यावर दुसर्या लग्नाचे प्रस्ताव म्हादुकडे आले पण त्याने स्पष्ट नकार दिला. पदरात पडलेल्या बाळाचा प्राणपणाने सांभाळ करायचा असे म्हदुने ठरवले. दुर्दैव काही त्याची पाठ सोडेना. आणखी वर्षभरातच त्याच हिरमोड झाला. बाळ मतीमंद निघाले. बाळाला नीट बोलता येत नव्हते कि चालताही येत नव्हते. या बाळाची आई आणि वडील अशा दोघीही जबाबदार्या म्हादुच पार पाडत होता. आता तर ते बाळच म्हादबाच सर्व विश्व होते. त्याने आपल्या बाळाचे नाव पिऱ्या ठेवले. पिऱ्या दोनच शब्द बोलू शकत होता. “बाबा- बाबा, बाबा-बाबा”. तेवढ्या दोन शब्दांमध्येच पिर्याचे विश्व समावलेले होते. जसजसा पिऱ्या मोठा होत होता, तसतसा तो फक्त बाबा- बाबा चे बोल तेवढे स्पष्ट उच्चारू लागला. बाकी पिऱ्या कधी काहीच बोलला नाही. म्हादबसाठी पिर्याच्या तोंडचे तोंडचे बाबा-बाबा हे शब्द अमृताहूनही गोड होते. प्रत्येक बापाला ते असतात तसे. येथे उच्च- नीच, स्पृश्य-अस्पृश्य माणूस- जनावर असा भेद निसर्ग कधीच करत नाही. या बाबा शब्दांभोवातीच म्हादबा व पिर्याचे आयुष्य गुंफलेले होते. पिर्याच्या सर्व ओर्डर बाबा बाबा या दोन शब्दांवर भागवली जात असे. फक्त म्हादबाच त्या शब्दांचा अर्थ लावू शकत होता. पिर्याची अंघोळ, तहान-भूक सर्व काही या दोन शब्दांत म्हादबाला काळात असे. हे सर्व म्हादबा अगदी आनंदाने अविश्रांत करीत असे.
एकदा का दुर्दैवाने तुमचा पिच्छा पुरवला कि ते सहजासहजी तुम्हाला सोडत नाही. बर्याचदा आयुष्य पूर्ण उध्वस्त करून टाकते.......... त्याचवेळी गावात अस्पृश्यामध्ये चळवळीचे वारे वाहू लागले. अस्पृश्य समाजात आपण अस्पृश्य असलो तरी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. अशी कुणकुण सुरु झाली. आम्हालाही समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घ्या, वगैरे वगैरे.. अशा म्हण्या जोर धरू लागल्या. या मागणीसाठी गावातील वातावरण बिथरले. उच्च जातीचे लोक या सगळ्यासाठी तयार नव्हते. बरेच दिवस वातावरण धुमसत राहिले.कुणीच काही निर्णय घेण्याप्रात येईना. विचारांची ढकलाढकली चालूच होती. अचानक एके दिवशी अस्पृश्यांनी उठाव केला कि यापुढे आम्ही स्पृश्यांची क्न्तीही कामे करणार नाही. भुकेने मेलो तरीही बेहत्तर पण आता माघार नाही. आम्हालाही तुमच्यासारखे जगायचे आहे.... आम्हीसुद्धा माणसंच आहोत.... तुमच्या पंक्तीत बसायचे आहे....... मंदिरात प्रवेश करायचा आहे. तुमच्या पाणवठ्यावरील पाण्याची चव चाखायची आहे.... नायतर आम्ही कोणतीच कामे करणार नाही. मेलेली ढोरंही उचलणार नाही, आणि दगड ही फोडणार नाही आणि शेतात कामालाही येणार नाही. प्रश्नाने उग्र रूप धारण केले होते. कुठेतरी समन्वय घडवून आणणे गरजेचे होते. गावचे पाटील हे मायाळू वृत्तीचे होते. त्यांनी आधीच गावकर्यांना स्पृश्य अस्पृश्यता न पाळण्याबद्दल समजावले होते. पण कोणीही त्यांच्या बाजूने नसल्याने ‘गाव करी ते राव काय करी’ त्यांचा नाईलाज झाला होता. आज मात्र सर्व गावकर्यांनी येऊन त्यांना हा जातील प्रश्न सोडवण्यासाठी साकडे घातले. प्रकरण फारच पेटले होते. गावकरी अस्पृश्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य करायस तयार नव्हते आणि अस्पृश्य सुद्धा आपल्या मागण्यांवर ठाम होते.
शेवटी पाटलांनी एका अटीवर मध्यस्ती करण्याचे मान्य करून ‘मी जो निर्णय देईल टी सर्वांनी मान्य करायला पाहिजे’ असे सांगितले. दोन्ही बाजूंना पाटलांचा आदर असल्याकारणाने होकार दिला. दोन्ही बाजूंनी पारडे तोलते ठेवणे गरजेचे होते. पाटलांनी “गावात असलेल्या अस्पृश्यांपैकी प्रत्येक अस्पृश्याला वर्षातून एक दिवस उच्चवर्णीयांप्रमाणे व्यतीत करता येईल”. असा निर्णय दिला. त्याला उच्च वर्णीयांच्या बैठकीत बसता येईल, त्यांच्यासारखे जीवन जगता येईल, असा निर्णय झाला. म्हणजे एक अस्पृश्य एका दिवसासाठी उच्चवर्णीय होणार. पण उच्चवर्णीयांनी एक अट टाकलीच.... अट अशी होती कि जो अस्पृश्य उच्चवर्णीय म्हणून जीवन जगेल त्याने त्या दिवशी उच्चवर्णीयांचे सर्व नियम पाळावयाचे. जसे सकाळी उठून डोक्यावरचे सर्व केस काढून सुगंधी पाण्याने अंघोळ घातली जाईल. सोवळे नेसून मंदिरा जावून त्याने देवाची यथासांग पूजा करावी नंतर सर्वांचे बरोबर पंक्तीत बसून जेवावे, त्याचबरोबर त्याने कोणत्याही अस्पृश्याला हात लावता कामा नये. नाहीतर तो बाटला जाईल. आणि गावाच्या पद्धतीनुसार त्याला सर्व उच्चवर्णीयांकडून जबर चोप दिला जाईल. वगैरे वगैरे...... सर्वानुमते हा निर्णय मान्य झाला. एकतर अपेक्षा नव्हतीच पण चला एक दिवस का होईना आपल्याला उच्चावार्नियांचे जिने जगायला मिळणार म्हणून प्रत्येक अस्पृश्य खुश होता. आपली पाळी कधी येईल, आपली वेळ आल्यावर आपण कसे वागू, काय काय करू, काय खाणार अशी स्वप्ने प्रत्येकजण रंगवत होता.
‘एकदा एका ओंडक्याला पालवी फुटली
त्यालाच कळेना जगण्याची  जिद्द कुठली.’
ठरल्याप्रमाणे गावातील एकेका अस्पृश्याचा सोडतीप्रमाणे दिवस येत होता, आणि तो अस्पृश्य उच्चवर्नियाचे जीवन जगण्याचा आनंद घेत होता. त्यांच्या पंक्तीत जेवत होता. मंदिरात जात होता उच्चवर्णीयांमध्ये मिसळत होता. त्याला कुणीही कमी लेखत नव्हते. स्वर्गसुखच म्हणा कि हे...... कारण जिवंतपणी मरणयातना भोगनार्यांसाठी हा एक दिवस स्वर्गासुखाबरोबरच होता.दिवसांमागून दिवस जात होते. प्रत्येक अस्पृश्य आपल्या दिवसाची वाट पाहत होता तसेच ज्यांचे उच्चवर्णीय म्हणून जीवन जागून झाले होते तो त्या दिवसाच्या आठवणी चघळत दिवस काढत जगात होता. इकडे म्हादबा व पिर्याचे आयुष्यही संथगतीने पुढे सरकत होते. इतरांप्रमाणे एक दिवस का होईना आपल्यालाही उच्च्वार्नियांप्रमाणे जीवन जगण्यास मिळेल या आशेने म्हादबाच्याही मनात आशेचे आकांक्षांचे धुमारे फुटत होते. त्या दिवशीचे स्वप्न रंगवत म्हद्बाचे दिवस जात होते. आणि एके दिवशी म्हादबाच्या नवे सोडत निघाली. म्हादबाला उद्या उच्चवर्णीय जीवन जगता येणार होते. तसे त्याला सांगण्यात आले.म्हादबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.
म्हद्बाने लगेच दुसर्या दिवसाची तयारी सुरु केली. डोक्यावरचे केस कापले गेले. स्वच्छ दाढी घोतली. सकाळी सकाळी म्हादबाला अत्तराच्या पाण्याने अंघोळ घातली गेली. सोवळे नेसावयास देऊन मंदिरात मंत्रोच्चाराने त्याची शुद्धी करवून घेण्यात आली. आणि त्याला मंदिरात पूजा करण्यास परवानगी देण्यात आली.आज म्हादबा खूप खुश होता.त्या खुशीत त्याला पिर्याची थोडावेळ आठवणच पडली. आज तो आनंदात नुसता गावभर फिरत होता.आजचा दिवस उच्चवर्णीय असल्याचा किती अभिमान त्याला वाटत होता.सार्वजन त्याच्याशी अदबीने बोलत होते.त्याच्याशी गप्पा मारत होते. कोणताही अपमानाचा लवलेश दिसत नव्हता. खरच स्वर्गात असल्यासारखे वाटत होते हे सर्व.........
हे सर्व करता करता दुपारच्या जेवणाची वेळ येऊन ठेपली. आता म्हादबाला सर्व उच्च्वार्नियांबरोबर पंक्तीत बसून जेवायला मिळणार होते. एऱ्हवी उष्ट्या पत्रावळीवरील अन्न गोळा करावे लागणारा म्हादबा सर्वांच्या समवेत पंक्तीत जेवायला बसला.सर्व प्रकारचे पक्वान्न म्हादबाच्या ताटात वाढले गेले. अरे वा! जिलेबी, गुलाबजाम, वरण भात, अशी कितीतरी प्रकारची व्यंजने म्हादबाच्या ताटात आज ओसंडत होती. सर्व पंक्तीला वाढल्याबरोबर प्रार्थना सुरु झाली..
“वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन हों नाम घ्या तुकाचे, अन्न हे परब्रम्ह जाणिजे यज्ञ कर्म, बोला पंढरीनाथ महाराज कि जय..... बसा”.
बस म्हटल्याबरोबर सर्वांनी जेवणास सुरुवात केली. म्हादबाने त्याचे आवडते व्यंजन जिलेबी उचलली, तोंडात टाकणारच इतक्यात त्याच्या कानावर आवाज आला...... बाबा-बाबा! म्हादबाच्या हातातला घास तिथेच अडकला.पिर्याची आर्त हाक म्हद्बाचे काळीज चिरत गेली. कानात गरम गरम शिसे ओतल्याप्रमाणे टी आरोळी म्हादबाच्या कानात घुमत राहिली. मंदिराच्या ओट्यावर सर्वजन जेवणावळीचा आस्वाद घेत होते. सर्व उच्चवर्णीयांची पंगत बसलेली.. आणि समोरच्या पटांगणात रणरणत्या उन्हात. गरम फोफाट्यात बसून पिऱ्या म्हादबाला आवाज देत होता. बाबा-बाबा, बाबा-बाबा, ....
म्हादबाचे संपूर्ण शरीर त्या आर्त हाकेने घामाच्या धारांनी डबडबले, आता काय करायचे, असे वाटत होते कि असेच उठून पळत जावून पिर्याला उचलून छातीशी कवटाळावे, त्याचे भराभरा पापे घ्यावे, आज आपल्याला त्याची आठवण कशी झाली नाही, आज आपण एवढे स्वार्थी व कठोर कसे झालो या विचाराने त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली.त्याला आज सकाळपासून कोणीच अंघोळ घातली नसणार कि दूधही पाजले नसणार या जाणीवेने त्याचा जीव कासावीस झाला.त्याला खूप तहान लागली असणार, तो गरम फोफाट्यात बसून फक्त बाबा-बाबा म्हणत असला तरीही म्हादबाला हे काळात होते कि माझा पिऱ्या भुकेने व्याकूळ झाला आहे. कारण त्याची भाषा फक्त म्हद्बालाच काळात होती. म्हादबा आहे त्याच स्थितीत गोठून गेला, पण आता काय करायचे हे त्याला सुचत नव्हते. आज तो उच्चवर्णीय होता व त्याचे सर्व नियम पाळणे त्याला बंधनकारक होते. आणि पिऱ्या मात्र अस्पृश्य ! आज नियमाप्रमाणे म्हादबा पिर्याला स्पर्श करू शकत नव्हता, त्याच्याबरोबर राहू शकत नव्हता कि त्याला खाऊपिऊ घालू स्जाकात नव्हता. पिर्याला स्पर्श करणे हे म्हादबाला वर्ज्य होते.नाहीतर परिणाम भयंकर होते. म्हादबाचे जेवण तिथेच थांबले, चेहरा घामाने डबडबला. समोर पिर्याचा बाबा-बाबा चा जयघोष चालूच होता. गरम फोफाटयात  पिर्याला चटकेही बसत होते. सूर्य डोक्यावर आल्याने त्याची तीव्रता वाढतच होती. तसतशी पिर्याची बाबा-बाबा बाबा-बाबा ची आरोळीही क्षणागानिक वाढत होती, सोबतच म्हद्बाची तगमग.......
म्हद्बाचे मन कासावीस झाले.मनात भावनांचा कल्लोळ उठला. नको हे उच्चवर्णीय जगणे असे त्याला वाटून गेले. पण आता पर्याय नव्हता. काय करावे हे त्याला कळेना. पंक्तीतील बाकी लोकांची जेवणे झाली.काहींना म्हादाबाची ही स्थिती कळली तर काहींनी त्या दिवशी हे अस्पृश्य फार माजले होते त्याचं सूड आज घ्यायला मिळणार म्हणून ते मनोमन आनंदीही झाले होते. ते फक्त बघ्याची भूमिका घेऊन आनंद घेत होते.म्हादबाला मात्र आजूबाजूला जे काही चालले आहे याची काहीच कल्पना नव्हती. त्याला फक्त बाबा-बाबा या हाकेचा जयघोष ऐकू येत होता. त्या आवाजाने त्याच्या मनात एक काहूर माजले होते. त्या काहुराची तीव्रता इतकी वाढली की म्हादबाने सर्व बंधने तोडून तो तडक ताटावरून उठला, ताटाजवळील पाण्याचा तांब्या उचलला व पळत जावून त्याने पिर्याला त्या गरम फोफाटयातून उचलून घेऊन पाणी पाजले.पिर्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने हवेत आपले हात उंचावून तल्या पिटायला सुरुवात केली. म्हादबानेही आनंदाच्या भारत त्याचे पटापट मुके घेत आपले प्रेम व्यक्त केले. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू जणू त्याच्याकडून झालेल्या अक्षम्य चुकांची साक्ष पिर्याला देत होते. सर्व जगाला जणू ते दिघे बाप-लेक विसरून गेले होते.
आजूबाजूच्या लोकांच्या भुवया तोपर्यंत उंचावल्या गेल्या होत्या. एका उच्चवर्णीयाने एका अस्पृश्याला स्पर्श केला होता. सर्वांनी एकाच गलका करत म्हादबाला झोडपण्यास सुरुवात केली.आजपर्यंतचा अस्पृश्यांवरील सर्व राग म्हादबा वर निघाला. त्यामुळे प्रत्येक उच्चवर्णीय त्वेषाने म्हादबाच्या अंगावर धावून गेला. हातात सापडेल त्याने म्हादबावर राग काढण्यात आला.म्हादबा रक्ताच्या थारोळ्यात पडला, तरीही त्याच्यावरील लोकांचा राग कमी होईना.आणि एकदाचा म्हादबा निपचित पडला व जागीच गतप्राण झाला. त्या भाउगर्दीत पिर्या कधीच बाजूला भिरकावला गेला होता.म्हादबा हालचाल करीत नाही हे पाहिल्यावर लोक बाजूला झाले आणि पिऱ्या “बाबा-बाबा, बाबा-बाबा” चा टाहो फोडत  म्हादबाकडे सरकत सरकत आला. आणि बाबा$$$$$$$$$$$ अशी मोठी आरोळी मारत पिर्याही तेथेच कोसळला......
“पिंपळाचे झाड कोठेही उगवत,
कोठेही उगवत म्हणून त्याच कसाही निभावत.”
कथाकथन संपले होते. सर्वांचे डोळे पाण्याने डबडबले होते. संपूर्ण हॉलमध्ये निरव शांतता पसरली होती. कोणालाही काही सुचत नव्हते, सार्वजन माझ्याकडे अनिमिष नजरेने बघत होते. मीही स्टेजवर तसाच उभा होतो. यापुढे काय झाले कुणालाच काही काळात नव्हते. पिर्याच्या बाबतीतला प्रश्न अनुत्तरीत ठेऊन मी फक्त चारोलीने हिंट दिली होती व स्टेजवरून खाली उतरू लागलो. टाळ्यांचा कडकडत झाला. तो थांबवण्यासाठी संयोजकांना दोनदा सूचना द्याव्या लागल्या. माझ्या कथाकाथानाला प्रेक्षकांनी साश्रू नयनांनी निरोप दिला. माझ्या कथाकाथानाला पहिले पारितोषिक मिळाले वेगळे सांगायला नको.
पिंपळाच्या झादाखाली बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले, आणि या पिंपळाच्या झाडणे मलाही आज माझी ओळख निर्माण करून दिली. यापेक्षा अजून काय...........

................................डॉं. आविनाश लांडगे (सांगाती) 

Friday, January 8, 2016

मोकळ आकाश ...... डॉं. अविनाश लांडगे (सांगाती)

मोकळ आकाश ...... डॉं. अविनाश लांडगे (सांगाती)

“कुणा कुणाला बंधनमुक्त राहायला आवडेल” असा प्रश्न जर विचारला तर माझ्या मते कुणीही ‘मला आवडणार नाही’ असे उत्तर देणार नाही. बरोबर आहे ना! त्याही पुढे जाऊन “मी स्वतंत्रच आहे” असे उत्तर देणारेही कमी भेटणार नाही.
काल नवीन वर्षाची सुरुवात झाली. खूप सारे शुभेच्छा संदेश आले व्हाटस ऍप वर. काही शुभेच्छा संदेश नवीन संकल्प करा या आशयाचे होते. यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेणार संदेश होता देवळाली केंद्रीय विद्यालयामध्ये काम करणाऱ्या श्री. धनंजय पारकर सरांचा. पारकर सरांचा आणि माझा परिचय काही फार जुना नाही. पण जिव्हाळा मात्र तयार झाला तोही एकाच वर्षात. त्यांच्या विद्यालयात मी सिनिअर सुप्रीटेंडंट म्हणून सी.बी.एस.सी. बोर्डची परीक्षा घ्यायला गेलो होतो. म्हणून झाला हा परिचय. एकाच वर्ष झाले भेटीला, पण ती  खोलवर रुजली. ती भविष्यात अशीच बहरेल अशी आशा आहे. त्याचे कारण एकच आम्हाला दोघानाही दोघांकडूनही काहीच अपेक्षा नाहीत. तर त्या शुभेच्छा संदेशामध्ये नवीन वर्षामध्ये काय संकल्प करावा यावर ओशोंनी केलेलं भाष्य पारकर सरांनी मला पाठवले होते. अशोंच्या मते “काहीच संकल्प करू नका” काहीतरी संकल्प करायचा याचा अर्थ पारतंत्र्यात जायचे. कारण आपण आपल्या मनाभोवती या पद्धतीने काहीतरी कुंपणे टाकतो... आणि मग सुरु होतो त्या कुंपणा मध्ये घुसमटनारा प्रवास..... बर्याच गोष्टी कराव्याशा वाटतात. पण संकल्प केलाय ना! मग मन मारून जगणे आले. आणि एक दिवस येतो आणि तो संकल्प तुटतो. मग मनाची अगतिकता समोर येते. एवढे दिवस संकल्प टिकवून तरी काय फायदा झाला. त्यापेक्षा संकल्पच करू नका ना!  कशाला गोठवायचे  मन....... वा! संकल्पच न करण्याचा संकल्प केलाय मी या वर्षी. कमी अधिक फरकाने तुम्हा सर्वांच्या बाबतीतही हेच घास्डत असते का? बघा.... मला वाटते घडत असणार. असो..... हे झाले संकल्पाच्या बाबतीत. संकल्प म्हणजे नियम केला आपण आपल्या स्वतःसाठी..... बरोबर? म्हणजे या नियमाच्या बाहेर वागायचे नाही. पण एक्सेप्शनल केसेस मध्ये नियम मोडला तर चालतो. म्हणजे आपण स्वतःला स्वतःच्याच हाताने बांधून टाकतो. आहात न सहमत माझ्याशी...... मग आपण स्वतंत्र कसे? आज प्रत्येक माणसाने कोणत्या न कोण्या प्रकारे स्वतःला बांधून घेतलेय... हो! खर बोलतोय मी..... म्हणजे मी अमुक पक्षाचा.... म्हणजेच पक्षाची संहिता मी पाळली पाहिजे (अडकले)....... मी अमुक एक धर्माचा.... म्हणजे धर्माची संहिता पाळली पाहिजे. भले ती लादलेली का असेना. (बरोबर ना!..... अडकले पुन्हा एकदा..) बहुतेकांच्या बाबतीत तर धर्म .... जात या गोष्टी ओघाने, अनुवंशिकतेने आलेल्या असतात.आणि आपण सगळे या गोतावळ्यात जळमटाप्रमाणे संपूर्ण आयुष्य गुरफटून टाकतो. त्या जाळ्यात एकदा का अडकले कि पुन्हा सुटका नाही...... आयुष्यभर आपण, स्वीकारलेल्या संहितेच्या संकल्पनांवर विचार सुद्धा करत नाही. याचीही कारणे आहेत.... धर्मशास्रावर संशय घेणे हे सुद्धा पापच आहे. असा अजून एक प्रचलित सिद्धात.मग काय आहे तेच नियम काटेकोरपणे पाळायचे. त्या नियमांच्या बाहेर काही वर्तन झाल्यास ‘पाप’ केल्याचा अपराध मनात ठेऊन आयुष्य कुंठायचे..... असा संपूर्ण खेळ जीवनभर चालू राहतो.....
समाजात अशा अपराधी भावनेने जगणार्यांची संख्या काही कमी सापडणार नाही. म्हणून तर आत्मिक शुद्धीसाठी गंगातिरी आणि गोदातीरी इतक्या मोठ्या रांगा लागत असतील ना.... हे काही फक्त गंगा किंवा गोदावरीचे चित्र नाही. मस्जीदिमध्ये असो वा चर्च मध्ये प्रायःश्चीतापोटी मोठी रक्कम देणार्यांची संख्या काही कमी नाही.. बर एवढ करूनही आपण पापमुक्त झालोय का याची काहीच खात्री नाही..... म्हणूनच अशा साठत गेलेल्या पापांची मरते वेळी भीती वाटू लागते आणि माणसे मरताना रडू लागतात. खर तर जगण्याचे अंतिम सत्यच जर मरण हे आहे. मग ते जवळ आल्यावर आनंदोत्सव साजरा करण्याचे सोडून हे रडत का असतील? असा प्रश्न मला नेहमी पडतो.
म्हणजे बघा नां....... आपण एखाद्या प्रवासासाठी निघालो, अ पासून ब पर्यंत जायचंय, मग ब पर्यंत पोहोचल्यावर आपण आनंदोत्सव साजरा करायला हवा. किंवा आपण सुखरूप पोहोचलो, आपल्याला प्रवास अर्ध्यावर सोडवा नाही लागला याचे समाधान व्यक्त करायला हवे. बरोबर ना!.....अर्थातच आनंद  व्हायला हवा. मग अ म्हणजे जन्म, सुरुवात आणि ब म्हणजे मरण किंवा प्रवासाचा शेवट असे गृहीत धरले तर आपण हा प्रवास पूर्ण केल्याचा आनंद व्हायला हवा. बरोबर! ..... पण लोक रडत का असतील?... शोधूयात का?... मला या मागे काही कारणे दिसतात. बहुधा हा प्रवास खिलाडू वृत्तीने पूर्ण केला नसावा. त्यामुळे विजयाचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. हरण्यापेक्षा कुमार्गाने/ चुकीच्या पद्धतीने मिळवलेली विजयश्री जास्त टोचते. आणि हे सर्व कुठेतरी सद्सद्विवेकबुद्धीला पटत नाही. कारण तुम्ही बाह्य जगाशी, आपल्या माणसांशी, सभांमध्ये हे सर्व पटवून देऊ शकता किंवा त्या प्रकारचे भास तयार करू शकता कि तुम्ही  कसे बरोबर होतात किंवा आहात. पण तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीशी तुम्ही प्रतारणा नाही करू शकत....कुणीच नाही करू शकत. मग हेच शल्य आयुष्यभर वाढत जात असावे आणि मरण जवळ आल्यावर टोचत असावीत. स्वच्छ/ शुभ्र, निरभ्र, निर्भेळ विजयश्रीचा आनंद  ती सल आपल्याला आपल्याला मिळू देत नाही. आणि आपण दुःखी होतो/ कष्टी होतो / रडवेले होतो.
दुसरे एक कारण असण्याची शक्यता अशी आहे कि कदाचित लोकांच्या मोह, असूया, काही सुटत नाही.. जगामध्ये कायम, अविनाशी, pernmanent असे काहीच नाही हे माहित असून सुद्धा बर्याच गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. जे दुःखाचे कारण बनत असावे. म्हणजे बघा न, एक नवी कोरी गाडी (मोटारसायकल किंवा चारचाकी) घेतली कि साधारण वीस वर्षांनी ती कालातीत होणार आहे, असे माहित असूनही आपण ती गाडी कालातीत झाली म्हणून दुःख करणार असू तर त्याल काय म्हणावे?....
यामागचे तीसरे कारण नियम मोडले म्हणून असेल कदाचित. नियम म्हणजे धर्म, समाज, चालीरिती यांचे नियम. म्हणा. त्यामागची अपराधी भावना ..... मरणानंतर देवाला उत्तर द्यावे लागेल, याची भीती...... पण मग नियम तरी कुठे एकसारखे आहेत सर्वांचे? एका धर्मात एकद्शीच्या दिवशी मटन खाल्ले तर पाप, तर दुसर्या धर्मात त्याच दिवशी ईद नेहमी येते. एका पंथात मद्य पिणे म्हणजे अपराध, तर दुसर्या धर्मात तेच मद्य देवाला अर्पिले जाते. सामान्य माणूस मात्र या सर्व जन्जालामध्ये इतका गुरफटून जातो कि त्याच्या चेहऱ्यावरील तेज गायब होऊन अपराधांच्या गडद काळ्या डागांची संख्या मात्र वाढत जाते. आणि शेवटी रडकुंडीस येतात.
या सगळ्यापेक्षा मी निसर्गाने घडवलेली एक प्रतिकृती आहे. निसर्गाने ठरवून दिलेले नियम हेच माझे नियम आहेत असे गृहीत धरून जीवन व्यतीत केले तर! कशाला जल्मातांमध्ये अडकायचे आणि अडगळीत पडायचे. .... निसर्गाचा एकाच नियम आहे.. “ओरबाडू नका” बस्स. बाकी काहीच नाही.जे तुमच्या वाट्याला आहे त्यावर तुमचा हक्क आहेच आहे.... दुसर्याच्या वाट्याचे ओरबाडू नका. हा.... तो स्वेच्छेने देत असेल तर हरकत नाही. बरोबर ना...... म्हणजे पहा तुमची पूर्तता झाल्यावर दुसऱ्याला देण्यामध्ये तुम्हालाही आनंद होतोच ना. तसाच त्यालाही होईल. आनंद दोघांनाही होईल. आणि ज्या गोष्टीमुळे आनंद निर्माण होतो, तीच तर आहे पुण्याईची परिभाषा. ज्या गोष्टीमुळे दुःख निर्माण होते/ अर्थातच ओरबाडण्याच्याच्या वृत्तीने, हि आहे पापाची परिभाषा. पटतंय का तुम्हाला?.......
कोणत्याही खेळात जास्त नियम असले कि अपघात होतात. आणि कोणताही खेळाडू सर्व नियम लक्षात ठेवत, ठेवत खेळू लागला तर स्वच्छ्न्दीपणे खेळू शकत नाही.... आपण कमीत कमी नियम बनवले तर जीवन नक्कीच संगीतमय, आनंदमय होईल. आणि अपघाताची, चुकांची शक्यता राहणार नाही. सर्व नियम लक्षात ठेवण्याचीही गरज नाही.
मग आपल्या साध्यापर्यंत पोहोचल्यावर असणारा चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच द्विगुणीत करणारा असेल आणि आजूबाजूच्या लोकांनाही स्फूर्तीदायी ठरेल. कारण विरमरण हे नेहमीच स्फूर्तीदायी असते. त्याहीपेक्षा तुमच्या चेहऱ्यावरील समाधान लोकांना जगण्याची नवी उर्मी देईल आणि  तुम्ही बनाल एक ‘रोल मोडेल’ आदर्श व्यक्तिमत्त्व.

इति संपूर्णम....... निघतोय पुढच्या बिंदू च्या शोधात. (२.१.२०१६)